जळगाव । जळगाव शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि जिल्हापेठ पोलिसांनी मध्यरात्री संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस. ग्राऊंड परिसरात पोलिसांनी रचलेल्या जाळ्यात दोन अट्टल ड्रग तस्कर अडकले आहेत. या कारवाईत पोलिसांनी ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा घातक अंमली पदार्थ जप्त केला असून, एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना १० जुलै रोजी पहाटे २.३५ वाजेच्या सुमारास जी.एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ एमडी ड्रग्सची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच एलसीबीच्या विशेष पथकाने रात्रीच्या अंधारातच जी.एस. ग्राऊंड परिसराची नाकेबंदी करत अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. काही वेळातच एका मोटारसायकलवरून तीन संशयित तरुण तिथे पोहोचले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा करताच, पोलिसांची चाहूल लागल्याने त्यातील एकाने अंधाराचा फायदा घेत तिथून धूम ठोकली. मात्र, पोलिसांनी जयेश देविदास तायडे (२७) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (३१) या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्या झडतीदरम्यान ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली असता सदर पदार्थ एमडी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी २ लाख ८१ हजार ५४० रुपयांचा एमडी आणि २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
प्राथमिक चौकशीत अटक आरोपींनी फरार आरोपी भैय्या सोनवणे याच्याकडून विक्रीसाठी एमडी घेतल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने फरार आरोपीचा शोध सुरू केला असून, या रॅकेटमागील इतर व्यक्तींचाही तपास सुरू आहे.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे जळगाव शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.















Discussion about this post