जागतिक महिला दिनानिमित्त, मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान
जळगाव । आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या चार शब्दांमध्ये स्त्रीचे संपूर्ण विश्व सामावलेले असून या चार नात्यांमुळेच कुटुंब उभे राहते, संस्कार रुजतात आणि समाजाचे भविष्य घडते. महाराष्ट्राची भूमी ही जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांसारख्या कर्तृत्ववान महिलांनी पावन केलेली आहे. या भूमीत स्त्री केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नाही, तर समाज परिवर्तनाची एक मोठी शक्ती आहे. आज प्रशासनातील विविध क्षेत्रांमध्ये महिला आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत असून प्रत्येक ठिकाणी महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कष्टाने स्वतःची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महिला अबला नसून सबला आहे. समाजाचे रक्षण असो किंवा संस्कृतीची जपणूक असो, महिलांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. “नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे” असे ठाम मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा नियोजन समिती कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय विभागांमध्ये उत्कृष्ट आणि प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी महिलांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत पालकमंत्र्यांनी पुरस्कार प्राप्त सर्व महिलांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महिला व बालविकास अधिकारी आर.आर.तडवी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणेही अत्यंत गरजेचे आहे स्त्री आरोग्यदृष्ट्या सक्षम असेल तर संपूर्ण कुटुंब आणि समाज निरोगी राहतो. महिलांनी आयुष्यातील कितीही अडचणी आल्या तरी आनंदी राहून सकारात्मकतेने जीवन जगले पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री कन्यादान योजना, सुकन्या समृद्धी योजना, लाडकी बहीण योजना तसेच महिला बचत गट अनुदान योजना यांमुळे महिलांना आर्थिक व सामाजिक बळ मिळत आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन आणि इतर अनेक विकास योजनांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे कार्य खूप मोठे असून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्यामुळे आज स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळाली असून त्यांची विविध क्षेत्रात प्रगती झाली आहे. सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी चांगली कामगिरी केली आहे. शासनाच्या बऱ्याच योजना घरोघरी जाऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिलाच करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाने महिलांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज महिला स्वावलंबी होऊन प्रगती करीत आहेत. असे त्यांनी सांगितले.
खासदार स्मिता वाघ यावेळी म्हणाल्या, महिला आई, बहीण, पत्नी अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपली भूमिका बजावत असते ही भूमिका बजावताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. एक महिला घर सांभाळते, कुटुंबाला सांभाळते नोकरी करते, व्यवसाय बघते सासू-सासर्यांची सेवा करते , मुलांकडे, पतीकडे लक्ष देते अशी विविध कामे एक महिला करीत असते त्यामुळे तिला आपण अष्टभुजेचे रूप म्हणतो. असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे आपल्या मनोगत म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडून आला आहे. बचत गटामुळे त्यांची प्रगती होत आहे. महिलांनी विविध क्षेत्रात कार्य करीत असताना आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे असे सांगितले.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यावेळी म्हणाल्या, महिलांनी सर्व जबाबदारी सांभाळत सर्व क्षेत्रात काम करत असताना परंतु याबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाला विविध शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.















Discussion about this post