जळगाव । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांवर सातत्याने कारवाया केल्या जात असल्या तरी वाळू माफियांचा हैदोस काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच जळगाव जवळील दापोरा शिवारात काल रात्रीच्या सुमारास वाळू माफियांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. रात्री उशिरा १ वाजेपर्यंत महसूल आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे ही कारवाई करत होते. मात्र, घटनास्थळी २५ ते ३० जणांचा प्रशासकीय ताफा तैनात असतानाही, वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली आहे की त्यांनी थेट शासकीय यंत्रणेला आव्हान देत डंपर पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर, या कारवाई दरम्यान वाळू माफियांनी दापोरा गावातील नागरिकांवर तलवार, कुऱ्हाड आणि चॉपर यांसारख्या जीवघेण्या हत्यारांसह हल्ला चढवल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दापोरा व धानोरा शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती (वाळू) उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी आणि पोलीस प्रशासनाचा २५ ते ३० जणांचा मोठा फौजफाटा रात्री कारवाईसाठी दापोरा येथे दाखल झाला होता. मात्र, कारवाई सुरू असतानाच वाळू माफियांनी थेट प्रशासकीय यंत्रणेसमोरच दादागिरी करत काही डंपर पळवून नेण्यात यश मिळवले.
प्रशासकीय कारवाई सुरू असताना दापोरे गावातील नागरिकही मोठ्या संख्येने तिथे जमा झाले होते. वाळू माफियांच्या बेकायदेशीर कृत्याला विरोध दर्शवण्यासाठी नागरिक आले असता, वाळू माफियांनी आणि त्यांच्या गुंडांनी थेट गावकऱ्यांनाच लक्ष्य केले. गुंडांनी हातात तलवार, कुऱ्हाड, आणि चॉपर घेऊन गावकऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. या गोंधळात एका वाळू माफियाने थेट एका ग्रामस्थावर जीवघेणा वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दैव बलवत्तर म्हणून तो वार हुकला आणि मोठा अनर्थ टळला. या सशस्त्र दहशतीमुळे गावकऱ्यांना जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढावा लागला.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि महसूलचे अधिकारी हजर असतानाही वाळू माफिया एवढी हिंमत कशी करू शकतात? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला आहे.”जळगाव तालुका पोलीस स्टेशन हे पूर्णपणे वाळू माफियांसोबत मॅनेज झाले आहे, म्हणूनच पोलिसांच्या देखत डंपर पळवले गेले आणि गावकऱ्यांवर हत्यारे उगारली गेली,” असा थेट आणि गंभीर आरोप दापोरा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.















Discussion about this post