जळगाव | जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत दारूबंदी कायद्याचे उल्लंघन, जुगार, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान आणि टवाळखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. एका रात्रीत ४० हून अधिक जण पोलिसांच्या कारवाईच्या जाळ्यात अडकले.
मोहीमेदरम्यान विविध ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी मुंबई प्रोहिबिशन कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल केले. या कारवाईत देशी-विदेशी मद्य, हातभट्टीची दारू, कच्चे रसायन आणि केमिकल असा एकूण ६ लाख ५२ हजार ८७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध जुगार अड्ड्यांवरही पोलिसांनी धाड टाकत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले. तसेच सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली करणाऱ्या आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या १९ टवाळखोरांवर बीपी ॲक्टअंतर्गत कारवाई करण्यात आली.
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या सात जणांविरोधातही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती, अवैध व्यवसाय आणि कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा मोहिमा नियमितपणे राबवून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.















Discussion about this post