जळगाव । राज्यातून पावसाने माघार घेतल्याने बहुतांश भागांत निरभ्र आकाश आणि उन्हाचा चटका कायम आहे. ऑक्टोबरच्या मध्यातही वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून, अनेक शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. यात जळगावचाही समावेश असून, येथे ३७.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, कोकण विभागातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येलो अलर्ट जारी केला आहे.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे. वाढलेल्या उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहत असून, उन्हामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांवरही परिणाम होत आहे. पावसाळा संपल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट न झाल्याने उकाड्याचा त्रास कायम आहे.
जळगावात तापमान ३७.१ अंशांवर
राज्यातील वाढत्या तापमानाचा फटका जळगाव जिल्ह्यालाही बसत आहे. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जळगाव येथे ३७.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातही जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम असल्याचे चित्र आहे. दिवसा तीव्र ऊन आणि उकाड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रत्नागिरीत राज्यातील उच्चांकी तापमान
राज्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे सर्वाधिक ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अमरावती येथे ३८.२, अकोला येथे ३८.१, मुंबईतील सांताक्रूझ येथे ३८, यवतमाळ येथे ३७.७ आणि सोलापूर येथे ३७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. जळगावचा पारा ३७.१ अंशांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
कोकणातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट
मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी उन्हात अधिक वेळ राहणे टाळावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता
दरम्यान, दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून देशातून माघारी परतत आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता असून, आगामी काळातील हवामानातील बदलांकडे लक्ष लागले आहे.















Discussion about this post