जळगाव । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगरसह विविध भागांत शनिवारी सकाळी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे कारण स्पष्ट झाले आहे. शेजारील मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्याजवळ ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे सौम्य हादरे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातही जाणवले. सकाळी अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मध्य प्रदेशातील खरगोनजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र आणि आंतरराष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य प्रदेशातील खरगोनपासून सुमारे २७ किलोमीटर आणि धामनोदपासून ६९ किलोमीटर अंतरावर होता. विशेष म्हणजे, हा भूकंप जमिनीपासून अवघ्या १० किलोमीटर खोलीवर झाला. त्यामुळे केंद्रबिंदूच्या आसपासच्या विस्तृत परिसरात भूकंपाची कंपने जाणवली.
चोपडा, यावल, भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये हादरे
मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांना या भूकंपाचे धक्के जाणवले. उपलब्ध भूकंप मापन नोंदीनुसार, केंद्रबिंदूपासून सुमारे ४६ किलोमीटर अंतरावरील चोपडा आणि ४९ किलोमीटर अंतरावरील यावल परिसरात भूकंपाची कंपने जाणवली. याशिवाय भुसावळ शहर आणि मुक्ताईनगर परिसरातही सकाळी ९.२० वाजेच्या सुमारास नागरिकांना जमिनीला हादरा बसल्याचा अनुभव आला. मध्य प्रदेशातील सेंधवा, बऱ्हाणपूर आणि खांडवा परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले.
नागरिकांची घराबाहेर धाव; सुदैवाने कोणतीही हानी नाही
शनिवारी सकाळी नागरिक आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक जमीन हादरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. घरातील वस्तू हलू लागल्याने काही नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर धाव घेतली. तर अनेकांनी फोनद्वारे नातेवाईक आणि परिचितांकडे भूकंपाचे धक्के जाणवले का, याची विचारपूस केली. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू झाली.
दरम्यान, या भूकंपामुळे जळगाव जिल्ह्यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.















Discussion about this post