जळगाव । जळगावमध्ये पर्यावरणपूरक ई-बस सेवेच्या सुरूवातीस आता वेग मिळाला आहे. महापालिकेने या बसच्या नियमित संचालनासाठी १२० वाहक पुरवठादार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
२०२५-२६ आर्थिक वर्षासाठी महापालिकेने २० कोटी २ लाख १७ हजार ६०० रुपयांची ई-निविदा प्रकाशित केली आहे. शहरातील प्रवाशांना दर्जेदार आणि नियमित सेवा मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे, आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी महापालिका १२० वाहकांची भरती करणार आहे.
इच्छुक आणि पात्र पुरवठादारांना २३ फेब्रुवारी २०२६ पासून महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अटी व शर्तीसह सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी कोणत्याही टप्प्यावर निविदा स्वीकारण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार स्वतःकडे राखून ठेवला आहे. त्यामुळे निवड प्रक्रियेत काटेकोरपणा राखला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ई–बस सेवेच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने सुरू असून, ई–बस आगाराच्या वाहनतळाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. चार्जिंग स्टेशन, विद्युत पुरवठा यंत्रणा, देखभाल केंद्र, नियंत्रण कक्ष आदी सुविधा उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच बस गाड्यांचा ताफा शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. जळगाव शहरासाठी एकूण ५० ई–बस मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३० बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या ३० बसेसमध्ये १२ मीटर लांबीच्या २४ मोठ्या प्रवासी क्षमतेच्या बसेस आणि नऊ मीटर लांबीच्या सहा मध्यम आकाराच्या बसेसचा समावेश असेल. मोठ्या बसेस मुख्य मार्गांवर धावणार असून, मध्यम आकाराच्या बसेस उपनगर व अंतर्गत भागांसाठी उपयोगी ठरणार आहेत.















Discussion about this post