जळगाव । जळगाव शहरातील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर गुरुवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र छबुलाल चौधरी (वय ३५, मूळ रा. उत्राण, ता. एरंडोल, सध्या रा. चंदूअण्णानगर, जळगाव) असे मृताचे नाव असून, ते एका नामांकित खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कुटुंबातील एकमेव आधार असलेल्या रवींद्र यांच्या निधनाने चौधरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र चौधरी हे ‘मोतीलाल ओसवाल’ या खासगी वित्तीय संस्थेत शाखा अधिकारी पदावर कार्यरत होते. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या हिरो एचएफ डिलक्स दुचाकीने (क्र. MH 19 DN 1282) कामावर जाण्यासाठी निघाले होते. आकाशवाणी उड्डाणपुलावरून जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने (क्र. RJ 50 GA 9234) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. या धडकेत रवींद्र हे थेट ट्रकच्या चाकाखाली आले आणि गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) विच्छेदनासाठी हलविला. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली आहे. रवींद्र चौधरी यांच्या पश्चात पत्नी आणि वृद्ध आई असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या आवारात केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावणारा होता. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
उड्डाणपुलावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
तरसोद बायपासचे काम पूर्ण झाल्यानंतर जळगाव शहरातील अंतर्गत प्रमुख रस्त्यांवरील आणि उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. आकाशवाणी उड्डाणपुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अवजड वाहनांचे शहरांतर्गत नियमन, वाहनांची वेगमर्यादा आणि अपघातप्रवण ठिकाणांवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या पुलावरील वाहतूक व्यवस्थेचा तातडीने फेरआढावा घेऊन ठोस उपाययोजना करावी, अशी संतप्त मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.















Discussion about this post