जळगाव । जळगाव जिल्ह्यात कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी आणि वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम’ हाती घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान तब्बल २,२०० वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या धडक कारवाईत विविध नियमभंगांच्या ५७६ केसेस नोंदवून पोलिसांनी ४ लाख ७२ हजार ५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या अचानक राबवलेल्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील टवाळखोर आणि बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे आणि सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. या विशेष मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या (ड्रंक अँड ड्राइव्ह) २० जणांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्या १२ जणांवर आणि उघड्यावर गांजा सेवन करणाऱ्या ७ जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
याशिवाय, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ४७ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी कडक भूमिका घेत कर्कश हॉर्न वाजविणाऱ्या २ वाहनांवर आणि कर्कश सायलेंसर वापरणाऱ्या एका वाहनावर कारवाई केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेत मोटार वाहन कायद्यान्वये एकूण ५७६ केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये मोटार वाहन कायद्याच्या कलम ६६/१९२ अन्वये ४ केसेसचा समावेश असून, गंभीर नियमभंग करणारी ३ वाहने पोलिसांनी ताब्यात (जमा) घेतली आहेत.
जिल्ह्यातील वाहतूक सुरक्षित राहावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मद्य किंवा अमली पदार्थांचे सेवन टाळावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.














Discussion about this post