जळगाव । सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असून, आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडत असून सराफा बाजारातही त्याचा परिणाम जाणवत आहे.
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २७० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर आता १,५५,१३० रुपये प्रति तोळा झाला आहे. बुधवारी हाच दर १,५४,८६० रुपये होता. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याच्या दरात २५० रुपयांची वाढ झाली असून, आज २२ कॅरेट सोनं १,४२,२०० रुपये प्रति तोळा दराने विकले जात आहे. तर १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली असून, त्याचा दर प्रति तोळा २१० रुपयांनी वाढून १,१६,३६० रुपये झाला आहे.
तीन दिवसांत सोनं ५,८०० रुपयांनी महागलं
गेल्या ७२ तासांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अवघ्या तीन दिवसांत १ तोळा सोन्याच्या दरात तब्बल ५,८०० रुपयांची वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात गेल्या पाच दिवसांत सोन्याच्या दरात प्रति तोळा ८,६४४ रुपयांची वाढ झाली आहे. या तेजीमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दराने प्रति ग्रॅम १.५२ लाख रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठल्याचे सांगितले जात आहे.
चांदीच्या दरातही विक्रमी तेजी
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरानेही नवा विक्रम नोंदवला आहे. गेल्या ७२ तासांत चांदीच्या दरात प्रति किलो १३,२०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत चांदीचा दर २,४२,६८० रुपयांवरून २,५५,००० रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा आजचा दर २५५ रुपये प्रति ग्रॅम, तर २ लाख ५५ हजार रुपये प्रति किलो इतका आहे.
सोन्या-चांदीच्या दरात होत असलेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट मात्र बिघडण्याची शक्यता आहे.















Discussion about this post