जळगाव । महागाईच्या चक्रव्यूहात अडकलेल्या सर्वसामान्य जनतेला इंधन कंपन्यांनी पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरच्या किमतीत २९ रुपयांची वाढ करण्यात आली असून, आज सकाळपासूनच हे नवीन दर देशभरात लागू झाले असून गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत झालेली ही दुसरी मोठी दरवाढ असल्याने गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
जळगाव आणि मुंबईतील नवे दर काय?
स्थानिक कर आणि वाहतूक खर्चातील फरकामुळे प्रत्येक शहरात सिलिंडरचे दर वेगवेगळे असतात. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील नवीन दर खालीलप्रमाणे आहेत:
जळगाव: जळगाव जिल्ह्यात १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आता ₹९१८.५० वरून थेट ₹९४७.५० वर पोहोचली आहे. दिल्ली आणि मुंबईच्या तुलनेत वाहतूक खर्चामुळे जळगावकरांना सिलिंडरसाठी साधारण ५ ते ६ रुपये अधिक मोजावे लागत आहेत.
मुंबई: मुंबईत १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरचा दर ₹९१२.५० रुपयांवरून थेट ₹९४१.५० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत हा दर ₹९१३ वरून आता ₹९४२ झाला आहे.
३ महिन्यांत तब्बल ८९ रुपयांची दरवाढ
विशेष म्हणजे ७ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ₹६० ची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा २९ रुपयांची दरवाढ झाल्याने, अवघ्या ३ महिन्यांच्या आत घरगुती सिलिंडर तब्बल ८९ रुपयांनी महागला आहे. तसेच मागील महिन्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ७ रुपयांची वाढ झाली होती, त्यात आता गॅस महागल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत.
दरम्यान, आखाती देशात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात ऊर्जेचा खर्च वाढला आहे. गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी तेल कंपन्यांना घरगुती विक्रीवर अजूनही मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली असून, भविष्यात गॅस सिलिंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता कंपन्यांनी वर्तवली आहे.
उज्ज्वला योजनेचा दिलासा:
एकीकडे सर्वसामान्यांसाठी दर वाढत असले, तरी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या’ (PMUY) लाभार्थी भारतीय कुटुंबांना सरकारी अनुदानामुळे (Subsidy) अजूनही स्वस्त दरात स्वयंपाकाचा गॅस खरेदी करता येत आहे.















Discussion about this post