रावेर । रावेर तालुक्यातील रमजीपूर येथील शेतातून चोरलेली ५ एच.पी. समूराई कंपनीची पाण्याची विद्युत मोटार विक्रीच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या मुसक्या आवळण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शेतातील मोटार व कॉपर वायर चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही दिवसांत आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी रमजीपूर येथील शेतकरी मोहन लालचंद कावडकर यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या शेतामधून ३ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरांनी ५ एच.पी. क्षमतेची पाण्याची विद्युत मोटार चोरून नेली होती. या चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर गुन्हे शोध पथक आणि बीट अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.
सापळा रचून आरोपींना अटक
तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, रमजीपूर गावातीलच काही संशयित इसम चोरीची मोटार विक्री करण्यासाठी आणणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राजेंद्र सुधाकर महाजन (वय ३०), उमेश प्रकाश धनगर (वय २३), रितेश जगन्नाथ कावडकर (वय २३) आणि आनंदा गोपाळ धनगर (वय २८, सर्व रा. रमजीपूर, ता. रावेर) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी खाकीचा बडगा दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली आणि लपवून ठेवलेला मोटार पंप पोलिसांच्या हवाली केला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असून त्यांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. या आरोपींनी अशाच प्रकारे आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, यात अन्य कोणी साथीदार आहेत का, याचा सखोल तपास बीट अंमलदार सिकंदर तडवी करत आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
दरम्यान, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरात किंवा ग्रामीण भागात जुनी मोटार, कॉपर वायर अथवा विद्युत पंप विक्री किंवा खरेदी करणाऱ्या संशयास्पद व्यक्तींबद्दल काही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा; माहिती देणाऱ्याचे नाव अत्यंत गोपनीय ठेवले जाईल.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संदीप पाटील, सपोनि अमूल बच्छाव, पोहेकॉ सिकंदर तडवी, पोकॉ योगेश पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी आणि विकार शेख यांच्या पथकाने पार पाडली आहे.















Discussion about this post