बुलढाणा। काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षाता (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेले चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अखेर आपला निर्णय बदलला आहे. काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी थेट फोन करून केलेल्या विनंतीनंतर राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मागे घेत काँग्रेसमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसण्यापासून टळला आहे.

चिखली विधानसभेचे माजी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेस सोडत असल्याचा आणि भाजपमध्ये जात असल्याचा निर्णय काल सोशल मीडियावर फेसबुक लाईव्ह करत जाहीर केला होता. एवढेच नव्हे तर, गेल्या दोन महिन्यांत त्यांनी दोनदा फेसबुक लाईव्ह करत आपण भाजपमध्ये जात असल्याचे म्हटले होते. या ताज्या घोषणेत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षातील सहकाऱ्यांचे आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल आभार देखील मानले होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

राहुल गांधींच्या फोनने फिरवले चक्र
माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे सर्वोच्च नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तात्काळ सूत्रे हलवली. त्यांनी थेट राहुल बोंद्रे यांना फोन करून त्यांची मनधरणी केली. “तुम्ही पक्षासाठी खूप चांगले कार्य केले आहे, तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ (लॉयल) आहात आणि पक्षाला तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे,” असे सांगत राहुल गांधी यांनी त्यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली.
“माझे सर्वकाही गमावले तरी काँग्रेससाठीच काम करणार”
पक्षश्रेष्ठींच्या या थेट हस्तक्षेपाने भारावलेले राहुल बोंद्रे यांनी राहुल गांधींना फोनवर सांगितले की, “तुम्ही स्वतः मला फोन केलात आणि माझी दखल घेतली, हे माझ्यासाठी खूप मोठे आहे. आता माझे सर्वकाही गमावले तरी चालेल, पण मी काँग्रेस आणि तुमच्यासाठीच काम करत राहीन.” या घडामोडींमुळे ऐनवेळी भाजपमध्ये जाणारे राहुल बोंद्रे आता काँग्रेसमध्येच कायम राहणार असून, यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.















Discussion about this post