जळगाव : राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दिवाळीचा सण चांगला साजरा करता यावा, यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जमा केली आहे. मात्र, आता या मदतीच्या रकमेवरून भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि ज्यांना या पैशांची गरज नाही, अशा शेतकऱ्यांनी ५ हजार रुपयांची मदत सरकारला परत करावी, असे महाजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
मंत्री गिरीश महाजन जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना हे आवाहन केले. महाजन म्हणाले की, सरकारने सर्वच शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत दिली आहे. मात्र, अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि त्यांना या पैशांची आवश्यकता नाही.
माझ्याकडे आज सकाळपासून जवळपास ५० शेतकरी आले होते. त्यांच्या खात्यातही सरकारने पाठवलेले ५ हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, आम्हाला या पैशांची गरज नाही, त्यामुळे ही रक्कम सरकारला परत करायची आहे, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी मांडली. आमचा शेतीपूरक व्यवसाय असून आर्थिक परिस्थितीही चांगली आहे, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे असल्याचे महाजन यांनी सांगितले.
गरजूंना मदत मिळावी, यासाठी परतावा करण्याचे आवाहन
पुढे बोलताना महाजन यांनी ज्या शेतकऱ्यांना या ५ हजार रुपयांच्या अग्रीम मदतीची गरज नाही, अशा आर्थिक सक्षम शेतकऱ्यांनी ही रक्कम सरकारला परत करावी, असे आवाहन केले. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा अधिक लाभ मिळावा, या भूमिकेतून त्यांनी हे विधान केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सरकारकडून देण्यात आलेल्या अग्रीम मदतीबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या या आवाहनाची चर्चा सुरू झाली असून, आर्थिक सक्षम शेतकरी त्यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.














Discussion about this post