चोपडा । जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून गांजासह कार, मोटारसायकल आणि पाच मोबाईल फोन असा ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत’ अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून अवैध अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व साठा करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
२६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.५३ वाजता पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना लासूर ते हातेड रस्त्यावरील पाटचारीजवळ हातेड शिवारात गांजाची तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. संशयित हयुंडाई सॅन्ट्रो (MH-14-BK-3113) या कारची तपासणी केली असता त्यामधून ७ किलो ११६ ग्रॅम गांजा आढळून आला.
या कारवाईप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४६/२०२६ दाखल करण्यात आला असून एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम २०(ब) व २२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंपरी, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, रा. टाकळीमिया, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) या तिघांना अटक केली आहे.
या कारवाईत ७ किलो ११६ ग्रॅम गांजा (₹१,७७,९००), हयुंडाई सॅन्ट्रो कार (₹३ लाख), पल्सर मोटारसायकल (₹९० हजार) आणि पाच मोबाईल फोन (₹४१ हजार) असा एकूण ₹६,०८,९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठा याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक किरण पारधी व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.















Discussion about this post