नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या डिप्लोमा धारकांसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने मोठी भरती जाहीर केली आहे. कंपनीने नॉन-एक्झिक्युटिव्ह कॅडरमधील विविध पदांसाठी एकूण १५४ रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून १३ ऑगस्ट २०२६ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) अर्ज करता येणार आहेत.
कोणत्या पदांसाठी भरती?
भरती प्रक्रियेत प्रोसेस टेक्निशियन (केमिकल) – ६० पदे, प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (केमिकल) – ६४ पदे, टेक्निशियन/ऑपरेटर (मेकॅनिकल) – १३ पदे आणि टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – १७ पदे अशा विविध पदांचा समावेश आहे.
पात्रता आणि अनुभव
अर्जदारांकडे संबंधित शाखेतील पूर्णवेळ डिप्लोमा असणे आवश्यक आहे. केमिकल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल शाखेतील डिप्लोमासह संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव किंवा अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.
सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना डिप्लोमामध्ये किमान ६० टक्के, तर एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५० टक्के गुण आवश्यक आहेत. बी.ई., बी.टेक. किंवा डिस्टन्स लर्निंगद्वारे डिप्लोमा केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र नसतील.
वयोमर्यादा आणि वेतन
१ जुलै २०२६ रोजी उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. नियमानुसार ओबीसी (एनसीएल), एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती NG-2 ग्रेडमध्ये करण्यात येईल. त्यांना दरमहा २६,५०० रुपयांपासून ३४,००० रुपयांपर्यंत वेतन मिळणार असून, याशिवाय महागाई भत्ता आणि कंपनीच्या नियमानुसार इतर भत्त्यांचाही लाभ दिला जाईल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड १०० गुणांच्या संगणक-आधारित परीक्षेद्वारे (CBT) केली जाईल. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची कौशल्य/प्राविण्य चाचणी (SPT) आणि वैद्यकीय तपासणी होईल.
अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी भारत पेट्रोलियमच्या अधिकृत संकेतस्थळावरील Careers विभागात जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.















Discussion about this post