जळगाव । अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे राहणाऱ्या एका नवविवाहित तरुण जोडप्याचा तापी नदीत संशयास्पद मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या दोघांचे पाय लोखंडी साखळीने एकत्र बांधून कुलूप लावलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह नदीत तरंगताना आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खाडबळ उडाली आहे.

श्याम हरी पाटील (वय २८, मूळ रा. पाडळसरे, ता. अमळनेर, हल्ली रा. उत्राण, ता. एरंडोल) आणि त्याची पत्नी सपना श्याम पाटील (वय २०) असे तापी नदीत मृत पावलेल्या दुर्दैवी जोडप्याचे नाव आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ तारखेला दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील तापी नदीत एक तरुण व तरुणीचे शव पाण्यावर तरंगत असल्याची माहिती नरडाणा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन कापडणीस आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला.
यावेळी तपासणी दरम्यान श्यामचा डावा पाय आणि सपनाचा उजवा पाय एका लोखंडी साखळीने एकमेकांना घट्ट बांधलेला असून त्याला मोठे कुलूप लावलेले आढळले. या भीषण दृश्यामुळे घटनास्थळी उपस्थित सर्वजण हादरले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात हलवले.
प्राप्त माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी श्यामचे कुटुंब पाडळसरे सोडून उत्राण येथे गेले होते. त्यानंतर आई-वडील मूळ गावी परतले, मात्र श्याम पाडळसरे येथे राहून शेती आणि ट्रॅक्टर चालविण्याचे काम करत होता. याच दरम्यान उत्राण येथील त्याच्या बहिणीकडे राहणाऱ्या सपनासोबत त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी गतवर्षी मे महिन्यात प्रेमविवाह केला होता.
अवघ्या तीन-चार दिवसांपूर्वीच हे दोघे बाहेरगावी गेले होते. मात्र, आज अचानक त्यांचे मृतदेह अशा भयंकर व गूढ परिस्थितीत नदीत आढळल्याने ‘हा घातपात आहे की आत्महत्या?’ याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मयत श्यामचे वडील हयात नाहीत, त्याच्या पश्चात विधवा आई आणि लहान भाऊ पाडळसरे येथे राहतात. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर मोठा आघात झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. नरडाणा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.














Discussion about this post