जळगाव । राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) सोमवारी (दि. २७) रात्री उशिरा एक मोठी कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील बडे शिक्षण संस्थाचालक आणि भाजप नेते संजय गरुड यांना एसआयटीने सातारा जिल्ह्यातील फलटण येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील एका प्रमुख आरोपीला अटक झाल्यामुळे या महाघोटाळ्याचे आणखी अनेक धागेदोरे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तपास पथक आज मंगळवारी सकाळी संजय गरुड यांना नाशिक येथे आणून नाशिकरोड न्यायालयात हजर करणार आहे. एसआयटीच्या तपासात संजय गरुड यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे समोर आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणात यापूर्वी जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एसआयटीने संजय गरुड यांच्यापर्यंत धागेदोरे पोहोचवत ही कारवाई केली. हिंगोणीकर यांनी पदाचा गैरवापर करून २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य मान्यता दिल्याचा आरोप आहे. तपासात यापैकी मोठ्या संख्येने कर्मचारी हे संजय गरुड यांच्या शिक्षण संस्थांशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे.
दरम्यान, संजय गरुड यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
एसआयटीच्या तपासानुसार, बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यातील एकूण ४८१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ४३८ जण जळगाव जिल्ह्यातील असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या गैरव्यवहारात जळगाव जिल्ह्याचा मोठा सहभाग असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.
संजय गरुड यांची अटक ही शालार्थ घोटाळ्याच्या तपासातील महत्त्वाची कारवाई मानली जात असून, या प्रकरणात आणखी शिक्षण संस्थाचालक, अधिकारी व संबंधित व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एसआयटीकडून या संपूर्ण रॅकेटचा आर्थिक आणि प्रशासकीय पैलूंनी सखोल तपास सुरू आहे.














Discussion about this post