भुसावळ । भुसावळ शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री दगडी पुला परिसरातील हनुमान मंदिराजवळ दोन अज्ञात हल्लेखोरांनी एकावर गोळीबार केल्याची घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, गोलू रायसिंग पंडित हे आपल्या घरासमोरील ओट्यावर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. हल्ल्यानंतर आरोपी क्षणार्धात घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपासही सुरू करण्यात आला आहे.
या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, हल्ल्यात किती गोळ्या झाडण्यात आल्या किंवा त्यात कोणी जखमी झाले आहे का, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी सर्व शक्य त्या अंगांनी तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post