जळगाव । जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ दुष्काळ घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चाऱ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांत तसेच राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची वाहतूक आणि विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे.

जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा मोठ्या प्रमाणावर बाहेर विक्रीसाठी पाठविला गेल्यास भविष्यात जिल्ह्यातच चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम पशुधनावर होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

हिरवा चारा, कडब्यासह पशुखाद्यावरही निर्बंध
या आदेशानुसार हिरवा चारा, कडबा, विविध प्रकारची कुट्टी, पेंढ, टीएमआर तसेच इतर पशुखाद्य जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर वाहून नेण्यास आणि विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाची अधिकृत मंजुरी असलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
चारा वाहतुकीवरील हा आदेश १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात आला असून, पुढील आदेश होईपर्यंत तो कायम राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा आणि भविष्यात निर्माण होणारी संभाव्य टंचाई टाळता यावी, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.















Discussion about this post