जळगाव | जळगाव-संभाजीनगर महामार्गावरील गाडेगाव घाटात भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. वळणावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेनंतर कार पलटी होऊन तिचा अक्षरशः चुराडा झाला.
एमएच १९ ईपी ९०६६ क्रमांकाची कार जळगावहून जात असताना गाडेगाव घाटातील वळणावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर आदळली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवासी वाहनात अडकून पडले.
या दुर्घटनेत कारचालक इस्रायल इरफान शेख (वय २१, रा. पिंपळदरी, ता. सिल्लोड) आणि पंकज हरीष बेंडवाल (वय ३४, मूळ रा. जळगाव, सध्या इंदूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप ओमप्रकाश परदेशी, अनुज रामावत परदेशी, गौरव राजू परदेशी आणि गिरीष योगेश चव्हाण (सर्व रा. खेडी, जळगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. कारचा पत्रा क्रेनच्या सहाय्याने वाकवून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त सर्वजण बांधकाम व्यवसायाच्या कामानिमित्त प्रवास करत होते. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेला पंकज बेंडवाल हा मार्केटिंग व्यवसायामुळे इंदूर येथे वास्तव्यास होता. केवळ तीन दिवसांपूर्वी तो जळगावात आला होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि अवघी सहा महिन्यांची चिमुकली मुलगी असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.















Discussion about this post