नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनातून मोठी बातमी समोर आली आहे. आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दीपके यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आंदोलनस्थळ तात्पुरते सोडावे लागले. यावेळी त्यांनी उपस्थित आंदोलकांची माफी मागत काही तास विश्रांती घेणार असल्याचे सांगितले.
अभिजीत दीपके हे २० जूनपासून जंतर-मंतर येथे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. गेल्या महिनाभरापासून सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक ताण वाढल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांनी काही काळासाठी आंदोलनातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.
ताप, अंगदुखी आणि तीव्र वेदनांचा त्रास
दीपके यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, त्यांना गेल्या काही दिवसांपासून ताप, तीव्र अंगदुखी आणि शारीरिक वेदना होत आहेत. वेदनाशामक औषधांच्या मदतीने ते आंदोलनात सहभागी होत होते. मात्र गुरुवारी प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना विश्रांती घेणे आवश्यक झाले.यापूर्वी मंगळवारीही त्यांना उलट्या झाल्या होत्या तसेच मंचावर भाषणादरम्यान चक्कर आल्याची माहिती समोर आली होती.
आंदोलकांची माफी मागत केली भावनिक पोस्ट
इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे की, “मला ताप आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या अंगात तीव्र वेदना होत आहेत. मी वेदनाशामक गोळ्या घेऊन कसेबसे तग धरून आहे. जर मी आज जंतर-मंतरवर तुम्हाला दिसलो नाही, तर कृपया मला माफ करा. मला काही तास विश्रांती आणि बरे होण्याची गरज आहे. मी संध्याकाळपर्यंत पुन्हा आंदोलनस्थळी परत येईन.”
दीपके यांनी प्रकृतीत सुधारणा होताच पुन्हा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समोर आल्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित समर्थक आणि आंदोलकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले असून, अभिजीत दीपके यांच्या प्रकृतीबाबत पुढील घडामोडींवरही सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.















Discussion about this post