धाराशिव – महाराष्ट्र्रात आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटला असून याच दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंजारा समाजातील तरुणाने आयुष्य संपवलं. धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील पवन गोपीचंद चव्हाण या ३२ वर्षीय तरुणाने बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात शेवटची नोट सापडली असून नातेवाईकांचा दावा आहे की, आरक्षणाच्या आंदोलनातून परतल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले
पवन चव्हाण हा लातूर येथील शाहू कॉलेजमधून बी.कॉम. पदवीधर होता. मात्र, बेरोजगारीमुळे तो हतबल झाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पवनने जिंतूर येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या बंजारा आरक्षण आंदोलनात दोन दिवस सहभाग घेतला होता. शुक्रवारी तो नाईक नगर येथे परतला. शनिवारी सकाळी पुन्हा आंदोलनासाठी जिंतूरला जाण्याच्या तयारीत असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
सुसाइड नोटमधून मागणी स्पष्ट-
पोलिसांना घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मयताच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत पवनने हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी नमूद केली होती. मुरूम पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पवनच्या नातेवाइकांनी त्याने बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा केला आहे.
जालन्यात 15 सप्टेंबरला महामोर्चा
बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी जालना येथे 15 सप्टेंबर रोजी बंजारा कृती समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारच्या 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. शनिवारी जालना येथे झालेल्या बंजारा कृती समितीच्या बैठकीत मोर्चाचे नियोजन करण्यात आले. आदिवासींच्या विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता, मूळ टक्केवारीतच बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी समितीने केली आहे.















Discussion about this post