मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सध्याचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मताशी आपण सहमत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोदींना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागेल, असा दावा करताना ‘१७ सप्टेंबरनंतर मोठा उलगडा होईल’, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांना राहुल गांधी यांनी आगामी एक वर्षाच्या आत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपद सोडावे लागेल, असे म्हटल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले की, आपण गेल्या काही दिवसांपासून आणि महिन्यांपासून हेच सांगत आहोत. नरेंद्र मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत आणि त्यांना वाईट परिस्थितीत पद सोडावे लागेल, असा दावा त्यांनी केला.
‘१७ सप्टेंबरनंतर चित्र स्पष्ट होईल’
१७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाबाबत मोठे विधान केले. १७ सप्टेंबरनंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, असा दावा त्यांनी केला. ‘१७ सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा वाढदिवस आहे,’ असे राऊत म्हणाले. तसेच मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर अमित शाह हे पंतप्रधान होतील, अशी शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
‘अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत’
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर अमित शाह हे पंतप्रधान होतील, अशी चर्चा केली जात असली तरी अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला. आपल्याकडे असलेली माहिती, राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्ये आणि समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे आपण हे बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषणही पंतप्रधान म्हणून शेवटचे असल्याचा दावा राऊत यांनी केला. मात्र, त्यांच्या या दाव्याबाबत कोणतेही ठोस पुरावे त्यांनी सार्वजनिक केलेले नाहीत.
‘चोरांनी चोराला सोडलं…’
अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणात चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीनचिट मिळाल्याच्या मुद्द्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘चोरांनी चोरायला सोडायचं हे चाललं आहे,’ अशी टीका त्यांनी केली. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्याविरोधातील आंदोलन संपणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले. मोरगाव येथे आंदोलन करण्यात येणार असून, आपण स्वतः या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post