भंडारा ! राज्यातील राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी करत भाजपविरोधात आघाडी केली. त्यानंतर बाजार समितीवरील भाजपची सत्ता गेली असून, शिवसेना शिंदे गटाचे आशू वंजारी सभापती झाले आहेत.
भंडाऱ्यात भाजपविरोधात मित्रपक्षांची आघाडी
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक आज पार पडली. सत्तेत असलेल्या भाजपने अडीच वर्षांपूर्वी दिलेली लेखी आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती. या गटांनी भाजपच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणला होता.
या उठावाचा निकाल आज निवडणुकीत पाहायला मिळाला. १८ सदस्यांच्या बाजार समितीत भाजपचे तीन सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे उपस्थित १५ सदस्यांनी एकमताने मतदान केल्याने १५-० अशा मतांनी शिवसेना शिंदे गटाचे आशू वंजारी सभापतीपदी विजयी झाले. त्यामुळे भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता भाजपच्या हातातून निसटली आहे.
सातारा जिल्हा बँकेतही भाजपला धक्का
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपला धक्का बसला आहे. या बँकेत भाजपचे सर्वाधिक ९ संचालक असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने सत्ता स्थापन केली.
अध्यक्षपदासाठी १२ मतांची आवश्यकता होती. भाजपकडे ९, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे ८, तर शिवसेना शिंदे गटाकडे ४ संचालक होते. शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ८ आणि शिवसेनेच्या ४ संचालकांना एकत्र करत बहुमताचा आकडा गाठला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अध्यक्षपद, तर शिवसेना शिंदे गटाला उपाध्यक्षपद मिळाले. सलग दोन सहकारी संस्थांमधील या राजकीय घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.















Discussion about this post