बोदवड । अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आलीय. मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार मामा आणि भाच्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना ८ फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास घडली.
करंजी साळशिंगी जंगल परिसरात हा अपघात घडला. शिवाजी राजाराम काळबैले (वय ५०) व ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे नात्याने मामा-भाचा असून काळबैले यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करून घरी दुचाकीने परत येत होते. बोदवड- भुसावळ रस्त्यावर बोदवडपासून आठ किमी अंतरावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघे जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळाली असता नगराध्यक्ष आनंदा पाटील, सुनील बोरसे यांनी रुग्णवाहिका घेत घटनास्थळ गाठले.
अपघातात मृत्यू झालेल्या शिवाजी काळबैले यांच्या मुलीचा विवाह सोहळा १७ फेब्रुवारीला नियोजित होता. लग्न आठ दिवसांवर असल्याने घरात सर्व तयारी सुरु असताना वडिलांचाच मृत्यू झाल्याच्या घटनेने लग्नघरी शोककळा पसरली आहे.















Discussion about this post