मुंबई । नॅशनल क्राइम ब्युरो २०२२ च्या अहवालानुसार देशात सर्वाधिक भ्रष्टाचार होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानी आहे.तसेच दंगलीचे प्रकरणेही महाराष्ट्रात सर्वाधिक घडली आहे. यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातील परिस्थिती चिंता निर्माण होणारी आहे.
राज्यात भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. भ्रष्टाचाराच्या तक्रारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) गेल्यानंतर कारवाई केली जात आहे. तरी देखील भ्रष्टाचार काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. यामुळे भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात टॉपमध्ये आहे.
राज्यात ९४९ भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. देशात हे सर्वाधिक गुन्हे आहेत. यामुळे भ्रष्टाचारात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या यंदाच्या वर्षातील आकडेवारीनुसार भ्रष्टाचारात राज्यात नाशिक शहर पहिल्या क्रमांकावर आहे.
शिक्षणाचे माहेरघर आणि देशातील सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराने भ्रष्टाचारात आघाडी घेतील आहे. पुणे शहर भ्रष्टाचाराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ या म्हणीप्रमाणे भ्रष्ट्राचारातही पुणे मागे नसल्याचे समोर आले आहे. भ्रष्टाचारामध्ये गेल्या वर्षी पुणे राज्यात पहिल्या क्रमांकावर होते. तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
देशात 2022 मध्ये सर्वाधिक दंगलींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात 8,218 दंगलीचे गुन्हे नोंदवण्यात आले.तसेच खून आणि हत्याच्या गुन्ह्यात महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहारनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये महाराष्ट्रात 2,295 खून झाले होते. महाराष्ट्रात बलात्काराची 2,904 प्रकरणे घडली आहे.















Discussion about this post