रावेर । जळगाव जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला आहे. डोक्यात दगड टाकून तरुणाची हत्या झाली आहे. ही घटना रावेर तालुक्यातील निबोळी शिवारात घडली आहे. शेख अफजल शेख असलम उर्फ कालू (वय २७, रा.ऐनपूर ) असं मृत तरुणाचे नाव असून याबाबत निंभोरा पोलीस स्टेशनला फिर्यादी फिरोज खान मोहम्मद खान यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की ऐनपूर येथील मयत शेख अफजल शेख असलम हा १४ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतात जात असल्याचे सांगून घरून निघाला. रात्री उशिरापर्यंत मयत शेख अफजल शेख असलम हा परतला नसून, वडीलांनी त्याला फोन केला. मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने वडिलांनी छोट्या भावाकडे फोन करून विचारणा केली. लहान भाऊ शेख फारुख हा त्याच्या शोधात शेताकडे गेला असता त्याचा मृतदेह आढळून आला. मात्र दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास त्याची ऐनपूर-निंबोल दरम्यान शिवारात गायरान जमिनीच्या रस्त्यांवर त्याचा मृतदेह आढळून आला. ज्या रस्त्यांवर मृतदेह आढळला त्या रस्त्यांवरच त्याचे शेतही आहे.
शेख अफजल हा म्हशी विक्रीची व्यवसाय करून शेती करत होता. त्याची घरची परीस्थीती जेमतेम आहे. शांत आणि संयमी अशी त्याची ओळख होती. त्याचा खुन झाला तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब हे द्वारदर्शनावर मलकापुर येथे गेले होते. मृतदेहाजवळ एका भलामोठा दगड आढळून आला आहे. त्याच्या हत्येमागे नेमका कोण व किती जण आहे हे सध्या सामोर आले नाही. या खुनाच्या घटनेमुळे परीसर हादरला आहे. स्वान पथक दाखल होत पंचनामा करत पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.