जामनेर : तालुक्यातील पहूर परिसरातील गोगडी धरणात बोट उलटल्याची थरारक घटना घडली असून, तब्बल तासभर पाण्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या चार जणांचे चार युवकांनी प्राण वाचविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, डाभुर्णी येथील रहिवासी असलेली खुशी लखन परदेशी ही पळसखेडा (ता. सोयगाव) येथे पाहुणी म्हणून आली होती. ती अचल संजय कवाल आणि तिचा चुलत भाऊ अमोल रूमसिंग कवाल यांच्यासोबत गोगडी धरण परिसरातील शेतात गेली होती. शेताच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी हे तिघे बोटचालक आनंदा काशिनाथ भिल यांच्या बोटीतून प्रवास करत होते.
बोट मध्यभागी येताच तोल गेला
बोट धरणाच्या मध्यभागी पोहोचली असताना अचानक तिचा तोल जाऊन बोट पलटी झाली. बोट प्लास्टिकची असल्याने पाण्यात पडलेल्या चौघांनीही हिंमत न हारता जवळपास तासभर बोट घट्ट धरून ठेवली आणि मदतीसाठी जोरजोरात आरडाओरड सुरू केली. काठावर असलेल्या शेतकऱ्यांना हा आवाज ऐकू आल्यानंतर त्यांनी तातडीने धरणाकडे धाव घेत बचावकार्य सुरू केले.
मदतीसाठी धावले ‘देवदूत’
घटनेची माहिती मिळताच पहूर पेठचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य राबवण्यात आले. दरम्यान, चार युवकांनी पाण्यातील ट्यूब आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जॅकेटच्या मदतीने उलटलेल्या बोटीपर्यंत पोहोचून चारही जणांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
“काळ आला होता, पण वेळ आली नव्हती”
जवळपास एक तास पाण्यात राहून चौघांनी जीव वाचवण्यासाठी निकराचा लढा दिला. वेळीच मदत पोहोचल्याने चौघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या चार युवकांनी केलेल्या धाडसामुळे उपस्थितांनी त्यांचे कौतुक करत “देव तारी त्याला कोण मारी” आणि “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” अशा भावना व्यक्त केल्या.














Discussion about this post