जळगाव । सोन्या-चांदीच्या बाजारात आज मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाढीच्या दिशेने असलेल्या मौल्यवान धातूंच्या किमतींनी आज अचानक माघार घेतली. २५ नोव्हेंबर रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ३ हजार ८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो ९ हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जळगावच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात आज लक्षणीय घट झाली. १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत ३ हजार ८०० रुपयांची कपात झाल्याने जीएसटीसह भाव आता १ लाख २६ हजार ६९० रुपयांवर आला आहे. सलग दोन दिवस दर वाढल्यानंतर झालेल्या या घसरणीमुळे सोने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सोन्याबरोबरच चांदीच्या बाजारातही दर घसरले आहेत. एक किलो चांदीच्या किमतीत तब्बल ९ हजार रुपयांची घट झाली आहे. परिणामी, जीएसटीसह चांदीचा भाव १ लाख ५३ हजार ४७० रुपयांवर पोहोचला आहे. एकाच दिवसात झालेल्या या घसरणीने सराफ बाजारातील दरांचे चित्र बदलले आहे.
लग्नाच्या खरेदीसाठी ग्राहकांना दिलासा
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अनेक कुटुंबांकडून सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जात आहे. मात्र, अलीकडच्या काळात वाढणाऱ्या किमतींमुळे ग्राहकांना खरेदीचे नियोजन करताना अडचणी येत होत्या. अशातच आज सोन्या-चांदीच्या दरात झालेली मोठी कपात ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. आगामी दिवसांत बाजारातील दर कोणत्या दिशेने जातात, याकडे आता खरेदीदारांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post