जळगाव । जळगाव शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी नारळ, लिंबू, अंडे, दारूची बाटली आणि अगरबत्ती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या वस्तूंचा वापर करून अघोरी पूजा किंवा काही विधी करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, स्मशानभूमीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका व्यक्तीच्या हालचाली कैद झाल्याची माहिती समोर आली आहे.
तुकारामवाडी परिसरातील रहिवासी अनिल तुळशीराम चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्यावर नेरी नाका स्मशानभूमीत हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर त्यांचे भाचे रवींद्र चौधरी स्मशानभूमीत पाहणी करण्यासाठी गेले असता, अंत्यसंस्कार झालेल्या जागेवर त्यांना नारळ, लिंबू, अंडे, दारूची बाटली आणि अगरबत्ती आढळून आली. हा प्रकार पाहून नातेवाईकांना धक्काच बसला.
दरम्यान, स्मशानभूमीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती काही वस्तू घेऊन अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी जाताना आणि त्या जळत्या जागेत टाकताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकाराबाबतचा संशय आणखी बळावला आहे. मात्र, संबंधित व्यक्ती कोण आहे आणि त्याने नेमक्या कोणत्या उद्देशाने या वस्तू तिथे आणल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नातेवाईकांमध्ये संताप
या घटनेमुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती रवींद्र चौधरी यांनी दिली आहे.आता CCTV फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटते का आणि या प्रकारामागे नेमके कारण काय आहे, याचा उलगडा पोलिस तपासातून होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post