नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. राजीव गांधी यांची हत्या होण्यापूर्वी त्यांची सुरक्षा व्यवस्था जाणीवपूर्वक हटवण्यात आली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. हा केवळ सुरक्षेतील निष्काळजीपणाचा प्रकार नव्हता, तर त्यामागे ठरावीक उद्देश होता, असेही त्यांनी म्हटल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंगः अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राच्या निमित्ताने आयोजित संवादात राहुल गांधी यांनी आपल्या वडिलांच्या हत्येपूर्वीच्या काही आठवणी सांगितल्या. यावेळी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी राजीव गांधी यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राहुल गांधी यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. ही बाब केवळ प्रशासकीय चूक किंवा अपघात नव्हती, तर राजीव गांधी यांची हत्या होण्यासाठीच असे करण्यात आले होते, असा त्यांचा दावा आहे. त्या काळात घडणाऱ्या घटनांवरून आपल्याला काहीतरी गंभीर घडण्याची भीती वाटत होती. याबाबत आपण आईला आधीच सांगितले होते. तसेच सुरक्षेच्या मुद्द्यावरून वडिलांशी आपला वादही झाला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.
या संवादात सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्या बिहार दौऱ्यातील एका भयावह प्रसंगालाही उजाळा दिला. त्यावेळी राजीव गांधी विरोधी पक्षनेते होते. बिहार दौऱ्यादरम्यान ते उघड्या जीपमधून प्रवास करत असताना त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी आणि निदर्शनेही झाली होती. हा संपूर्ण दौरा अत्यंत तणावपूर्ण आणि भीतीदायक होता, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये नेत्यांच्या सुरक्षेकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली होती. या घटनेमुळे राजीव गांधी यांच्या सुरक्षेबाबत गांधी कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली होती.
सोनिया गांधी यांनी यावेळी राहुल गांधी यांच्या बालपणीच्या एका प्रसंगाची आठवण सांगितली. बिहार दौऱ्यादरम्यान राहुल गांधी पूर्णवेळ वडिलांसोबत होते. त्यांनी स्वतः दगडफेक आणि निदर्शनांचा प्रकार पाहिला होता. या दौऱ्यावरून घरी परतल्यानंतर राहुल गांधी प्रचंड अस्वस्थ झाले होते.त्यावेळी त्यांनी आई सोनिया गांधी यांच्याकडे वडिलांच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली होती. पित्याच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर लवकरच त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पुन्हा परतावे लागेल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले.
२१ मे १९९१ रोजी झाला होता राजीव गांधींचा मृत्यू
दरम्यान, २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबदूर येथे आत्मघाती बॉम्बस्फोटात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (एलटीटीई) या संघटनेशी संबंधित आत्मघाती हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला होता. या घटनेत राजीव गांधी यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाला होता.राजीव गांधी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलेल्या या दाव्यामुळे त्यावेळच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि राजकीय घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.














Discussion about this post