जळगाव । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे बांधकामस्थळावरून लोखंडी आसारी चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यू इंग्लिश स्कूलसमोरील जलकुंभाच्या बांधकामासाठी आणलेली आसारी चोरी केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ४०० किलो लोखंडी आसारी आणि चोरीसाठी वापरलेली मालवाहू रिक्षा जप्त केली आहे. या कारवाईत एकूण १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नशिराबाद शहरातील न्यू इंग्लिश स्कूलसमोर जलकुंभाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे लोखंडी साहित्य बांधकामस्थळी ठेवण्यात आले होते. याच ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी आसारी लंपास केली होती. चोरीची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला. विशेष म्हणजे, या घटनेबाबत ठेकेदार किंवा संबंधितांकडून अधिकृत तक्रार दाखल नसतानाही पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संशयितांचा माग काढला. त्यानंतर सापळा रचून चार जणांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये त्यांनी आसारी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेली सुमारे ४०० किलो आसारी आणि माल वाहून नेण्यासाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली. या साहित्याची एकूण किंमत १ लाख २८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात गिरीश भागवत खैरनार (रा. कृष्ण मंदिराजवळ, नशिराबाद), पवन किशन कोल्हे, तुषार दीपक चौधरी आणि सुमित चेतनसिंह महाजन (सर्व रा. नशिराबाद) या चौघांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे बांधकाम साहित्य चोरी केले आहे का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळे तपासात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार आणि गणेश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.














Discussion about this post