जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या टप्प्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.
गुलाबराव पाटील हे जळगाव सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेची निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरोधात भाजपच्या जयश्री महाजन आणि प्रभाकर सोनवणे, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र तिन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतल्याने या माघारीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू झाली आहे. गुलाबराव पाटील हे पहिल्यांदाच जिल्हा बँकेची निवडणूक लढवत आहेत.
सुमित पाटीलही बिनविरोध
याच निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. पाचोरा विकास सोसायटी मतदारसंघातून सुमित पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधातील भाजपचे सतीश शिंदे यांनी माघार घेतल्याने सुमित पाटील यांची निवड बिनविरोध झाली.
सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने सुरुवातीला त्यांचा अर्ज बाद झाला होता. त्यानंतर सुमित पाटील यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले. सुनावणीनंतर त्यांचा अर्ज पुन्हा वैध ठरला आणि आता विरोधातील उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
सोनल पवार यांचीही बिनविरोध निवड
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांचीही जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. सोनल पवार यांच्या विरोधात असलेले शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील आणि भाजपच्या गायत्री पाटील यांनी माघार घेतली. त्यामुळे सोनल पवार यांची निवडही बिनविरोध झाली.
बिनविरोध निवडींची मालिका
जिल्हा बँक निवडणुकीत आतापर्यंत विविध मतदारसंघांमध्ये माघारीमुळे बिनविरोध निवडी होत असल्याचे चित्र आहे. मंत्री गिरीश महाजन यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर आता गुलाबराव पाटील, सुमित पाटील आणि सोनल पवार यांचीही बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post