जळगाव : वीजचोरीच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा लाचखोरीचा प्रकार जळगावमध्ये उघडकीस आला आहे. घरातील वीज उपकरणांचा लोड अधिक असल्याचे आणि सर्व्हिस वायरमध्ये छेडछाड करून वीजचोरी होत असल्याचे सांगत एका ग्राहकाकडे ४० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणात दोन वरिष्ठ तंत्रज्ञांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईत विशाल वसंत नेमाडे (वय ३७, सहाय्यक अभियंता), भरत कडू तायडे (वय ४५, वरिष्ठ तंत्रज्ञ) आणि रवींद्र छन्नू पाटील (वय ४१, वरिष्ठ तंत्रज्ञ) यांच्यावर कारवाई करण्यात आली. हे तिघेही महावितरणच्या जळगाव शहरातील महसूल व देयक उपविभागात कार्यरत आहेत.
मीटर तपासणीच्या निमित्ताने घराची पाहणी
मिळालेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता तिन्ही कर्मचारी एका ४० वर्षीय ग्राहकाच्या घरी नवीन वीजमीटरची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी मीटरसह घरातील विद्युत उपकरणांची पाहणी केली आणि त्यांचे फोटो काढले. तपासणीनंतर वरिष्ठ तंत्रज्ञ भरत तायडे याने ग्राहकाला फोन करून पांडे चौक परिसरात बोलावून घेतले.
तेथे घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे आणि सर्व्हिस वायर बायपास करून वीजचोरी केली जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची शक्यता व्यक्त करत ती टाळण्यासाठी ४० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप आहे.
लाच देण्याऐवजी ACBकडे तक्रार
संबंधित कर्मचाऱ्यांच्या लाचेच्या मागणीला बळी न पडता ग्राहकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर ACBच्या पथकाने पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली. या प्रक्रियेत भरत तायडे आणि रवींद्र पाटील यांनी सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांच्यासह स्वतःसाठी ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. अखेर १५ हजार रुपयांवर तडजोड झाल्याचेही पडताळणीत स्पष्ट झाले.
पांडे चौकात सापळा; पैसे स्वीकारताच कारवाई
लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी सहाय्यक अभियंता नेमाडे यांच्याकडे पैसे देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार ACBच्या पथकाने पांडे चौक परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने १५ हजार रुपये विशाल नेमाडे यांच्याकडे दिले. त्यांनी रक्कम स्वीकारताच पथकाने तत्काळ झडप घालून त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर या प्रकरणातील भरत तायडे आणि रवींद्र पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांवर एकाच वेळी झालेल्या या कारवाईने विभागात खळबळ उडाली आहे.
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जळगाव ACBचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, बाळू मराठे, राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.















Discussion about this post