मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चांमध्ये आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नाही आणि शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत,’ असे ठाम विधान राऊत यांनी केले आहे. शरद पवार आपली इतक्या वर्षांची राजकीय तपश्चर्या मातीत घालणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना दुजोरा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच पार्थ पवार यांनी अवघ्या ४८ तासांत दोन वेळा शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले. दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असतानाच संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘विलिनीकरणाची चर्चा कोण करतंय?’
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, विलिनीकरणाची चर्चा कोण करत आहे? शरद पवार बोलले का? सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे किंवा जयंत पाटील यांनी याबाबत काही सांगितले आहे का? पहिल्यांदाच अजित पवार गटातील लोक या विषयावर जोरजोरात बोलताना दिसत आहेत. कारण त्या गटातील अनेक जण सध्याच्या परिस्थितीत खूश नाहीत. ज्यांच्या डोक्यावर लाल दिवे आहेत, ते काही काळ खूश असतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपसोबत राहणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणे आणि लाचारी पत्करणे आहे, अशी टीका राऊत यांनी केली. भाजप आपल्या मित्रपक्षांना घरगड्याप्रमाणे वापरते आणि त्यांच्याशी तशीच वागणूक देते. आम्ही स्वाभिमानासाठी योग्य वेळी बाहेर पडलो, असेही ते म्हणाले.
‘शरद पवार धर्मांध शक्तींसोबत जाणार नाहीत’
शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना राऊत यांनी त्यांच्या विचारधारेचा दाखला दिला. शरद पवार धर्मांध आणि देश विकणाऱ्या शक्तींसोबत जाणार नाहीत. त्यांची स्वतःची विचारधारा आहे आणि ती भाजपची विचारधारा नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पवारांनी शाहू, फुले आणि आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेली आहे. अशा परिस्थितीत पवार भाजपसोबत जातील, असे म्हणणारे लोक मूर्ख आहेत. ते सुपारी घेऊन बोलत आहेत, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
अजित पवार गटाचे भवितव्य अमित शाह ठरवतात?
अजित पवार गटाच्या राजकीय भवितव्यावरही राऊत यांनी भाष्य केले. अजित पवार गट नेतृत्वहीन झाला असून या पक्षाला पुढे कोणती दिशा द्यायची, हे दिल्लीत बसलेले अमित शाह ठरवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाचे भवितव्यही अमित शाह यांच्या हातात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या घडामोडींकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नसून मनोरंजन म्हणून पाहावे, असेही ते म्हणाले.
सुनील तटकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, तटकरे काय बोलतात याला त्यांच्या पक्षातही फारसे महत्त्व राहिलेले नाही. त्यामुळे ते विलिनीकरणाच्या विषयावर बोलत आहेत. कोण काय म्हणते यापेक्षा शरद पवार काय भूमिका मांडतात, हे अधिक महत्त्वाचे आहे. इतर कोणापेक्षाही माझा शरद पवार यांच्यावर अधिक विश्वास आहे, असे स्पष्ट करत राऊत यांनी या चर्चांवर आपली भूमिका मांडली.दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी आणि विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे. आता शरद पवार आणि दोन्ही गटांचे प्रमुख नेते यावर अधिकृतपणे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post