नवी दिल्ली : 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. सलग तीन वेळा केंद्रात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2029 मध्येही नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
उत्तर प्रदेश भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यसमितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अमित शाह यांनी नरेंद्र मोदी हे 2029 मध्ये चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला.
मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब?
अमित शाह यांच्या या विधानाकडे भाजपच्या आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच काम करण्याचा स्पष्ट संदेश यातून देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, भाजपमध्ये 75 वर्षांनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या कथित नियमाची चर्चा अनेकदा होत असते. नरेंद्र मोदी यांचे वय सध्या 76 वर्षे असल्याने 2029 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास पंतप्रधानपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात होता.
मात्र, अमित शाह यांच्या घोषणेमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2029 मध्येही नरेंद्र मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे नेतृत्व करतील, असा ठाम विश्वास शाह यांनी व्यक्त केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाला आतापासूनच वेग येण्याची शक्यता आहे.















Discussion about this post