धुळे : शिरपूर तालुक्यातील आंबापाडा शिवारात वनजमिनीवर सुरू असलेल्या गांजाच्या बेकायदेशीर शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात तब्बल ६१० किलो वजनाचे गांजाचे पीक जप्त करण्यात आले. या गांजाची बाजारातील अंदाजित किंमत १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करणारे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
गोपनीय माहितीवरून डोंगराळ भागात छापा
शिरपूर तालुक्यातील आंबाफाटा गावाच्या पुढे असलेल्या डोंगराळ परिसरातील वनजमिनीवर अज्ञात व्यक्तींनी प्रतिबंधित गांजाची लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.यावेळी वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे लावण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण पीक जप्त केले. दुर्गम डोंगराळ भागात सुरू असलेली ही अवैध शेती उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ६१० किलो वजनाचे गांजाचे पीक जप्त केले आहे. त्याची अंदाजित बाजारभावानुसार किंमत १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. वनजमिनीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड करण्यात आल्याने या अवैध व्यवसायामागे नेमके कोण आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत शिरपूर पोलिसांचे अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड सहभागी झाले होते.या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















Discussion about this post