धुळे : धुळे शहराजवळील बोरविहिर गावाजवळ टोलनाक्याच्या परिसरात झालेल्या भीषण अपघातात मोरदड येथील दोन चुलत भावांचा मृत्यू झाला. चाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्याने ही दुर्घटना घडली. विनोद शामा बागुल यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर सागर काशिनाथ बागुल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे मोरदड गावासह धुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.
न्यायालयीन कामासाठी धुळ्यात आले होते
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विनोद बागुल आणि सागर बागुल हे दोघे चुलत भाऊ न्यायालयीन कामकाजासाठी धुळे शहरात आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत होते. याचदरम्यान बोरविहिर गावाजवळील टोलनाक्याच्या परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात विनोद शामा बागुल यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सागर काशिनाथ बागुल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. सागर बागुल हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. एकाच कुटुंबातील दोन तरुण चुलत भावांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजताच मोरदड गावात शोककळा पसरली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू असून संबंधित ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.














Discussion about this post