जळगाव । जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रविवारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
पक्षातील नाराजीतून घेतला निर्णय
शिवसेनेत कार्यरत असताना आपल्याला विश्वासात घेतले जात नव्हते आणि संघटनात्मक कामात वारंवार डावलले जात होते, अशी नाराजी निलेश पाटील यांनी व्यक्त केली होती. पक्षातील महत्त्वाच्या बैठकांना बोलावले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, पक्षात काम करताना योग्य संधी आणि जबाबदारी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आल्याने त्यांची नाराजी वाढल्याचे सांगितले जाते. संघटनेतील अंतर्गत मतभेद आणि अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याच्या भावनेतून त्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत अजित पवार गटात प्रवेश केला.
गुलाबराव पाटलांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप
शिवसेनेत असताना आपल्याला योग्य वागणूक मिळाली नाही, तसेच संघटनात्मक प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नव्हते, असे आरोप निलेश पाटील यांनी केले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षांतराची राजकीय वर्तुळात चर्चा होत असून, या घडामोडीचा शिंदे गटाच्या जिल्ह्यातील संघटनात्मक ताकदीवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.
अजित पवार गटाला संघटनात्मक बळ मिळण्याची अपेक्षा
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, प्रतिभा शिंदे, संजय पवार आणि योगेश देसले आदींच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. निलेश पाटील यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात दाखल झाले.
या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटाला संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात निलेश पाटील आणि त्यांचे समर्थक जिल्ह्यात पक्षवाढीसाठी कोणती भूमिका घेतात, तसेच या पक्षांतराचा स्थानिक राजकारणावर किती प्रभाव पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.















Discussion about this post