मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमधील कथित दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, शिंदेसेना आणि भाजपमधील संबंधांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपये श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांना दिल्याचा दावा एका महिलेने केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून, ‘५०० कोटी रुपये कुठे गेले, याचा मीही शोध घेत आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत. ज्याच्याकडे ५०० कोटी रुपये पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे, ते पैसे आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. जरांगे पाटील यांना जो प्रश्न पडला आहे, तोच प्रश्न आपल्यालाही पडला असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मीसुद्धा हे पैसे कुठे आहेत, याचा शोध घेत आहे. आम्हीही याच विषयावर चर्चा करत होतो. ५०० कोटी रुपये एकत्र कसे दिसतील आणि ते आणण्यासाठी किती गाड्या लागतील, यावरही चर्चा झाली,’ असे श्रीकांत शिंदे म्हणाले. या प्रकरणावर भाष्य करताना श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांनाही टोला लगावला. माध्यमे ज्या पद्धतीने या प्रकरणाचा शोध घेत आहेत, त्याचप्रमाणे आपणही गेल्या दोन दिवसांपासून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘तुम्हीही शोध घ्या, संशोधन करा. तुम्हाला काही कळले तर मला सांगा आणि मला काही कळले तर मी तुम्हाला सांगतो,’ असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. चौकशीतून नेमके काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान, ऑडिओ क्लिपमधील कथित दावे आणि ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील दाव्यांची सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post