जळगाव । जळगाव शहरालगतच्या खेडी परिसरातून रक्तरंजित हल्ल्याची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.नशा करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून भंगार व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. या हल्ल्यात किशोर मधुकर बाविस्कर(वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या हल्ल्यामुळे खेडी परिसरात तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत असे की, जळगावच्या खेडी येथील शिवनगर भागात राहणारे किशोर बाविस्कर हे भंगार विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी सायंकाळी काही तरुणांनी नशा करण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, बाविस्कर यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. शुक्रवारी सकाळी संशयितांनी पुन्हा बाविस्कर यांना गाठून पैशांसाठी तगादा लावला.
नकार मिळताच संतापलेल्या ३ ते ४ तरुणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात बाविस्कर यांच्या पाठीवर, कमरेवर आणि हातावर गंभीर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.















Discussion about this post