जळगाव । नवरात्रोत्सवानिमित्त गरबा-दांडिया पाहण्यासाठी बसलेल्या महिलांवर दुचाकीचा प्रखर लाईट पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून जळगावात रक्तरंजित घटना घडली. खेडी शिवारातील माऊली नगर परिसरात झालेल्या चाकूहल्ल्यात किरण विठ्ठल पाटील (वय ४४) यांचा मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, एमआयडीसी पोलिसांनी रोहित पाटील आणि मयूर पाटील या दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेडी शिवारातील माऊली नगर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त गरबा-दांडियाचा कार्यक्रम सुरू होता. काही महिला घराबाहेरील ओट्यावर बसून हा कार्यक्रम पाहत होत्या. दरम्यान, किशोर छगन पाटील हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्या वाहनाचा प्रखर प्रकाश महिलांच्या चेहऱ्यावर पडल्याने वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर हा वाद वाढत गेला. याचदरम्यान संशयित रोहित पाटील आणि मयूर पाटील यांनी किशोर पाटील यांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
वाद मिटवण्यासाठी किरण विठ्ठल पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किरण पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर किशोर पाटील हेही जखमी झाले. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या व्यक्तीला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेनंतर जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किरण पाटील यांना मृत घोषित केले. किशोर पाटील यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली. जळगाव शहराचे आमदार सुरेश तथा राजूमामा भोळे यांनीही रुग्णालयात जाऊन मृताच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले.
पोलिसांकडून दोन संशयित ताब्यात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत रोहित पाटील आणि मयूर पाटील या दोन संशयितांना काही तासांत ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोघेही १९ ते २० वर्षे वयोगटातील असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण, वादाची अन्य पार्श्वभूमी आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांच्या तपासानंतर घटनेचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post