जळगाव । सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अशातच स्वस्त दरात मक्याचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून चेन्नई येथील एका धान्याव्यापाऱ्याची तब्बल २१ लाख ९४ हजार ४४० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार जळगावातून उघडकीस आला आहे. फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधून हा व्यवहार निश्चित करण्यात आला होता. मात्र, पैसे घेऊनही मालाचा पुरवठा न करता फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात नागपूर येथील एका संशयितासह चौघांविरुद्ध आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पी. व्ही. सुरेश (वय ४५, रा. चेन्नई, तामिळनाडू) हे मूळचे धान्याचे व्यापारी असून सध्या ते जळगावातील भजे गल्ली परिसरातील मयूर लॉज येथे वास्तव्यास आहेत. संशयित शामलाल, विशाल शुक्ला (रा. नागपूर), अविनाश पाटील आणि अजित जागीर सिंग सिद्धू यांनी फेसबुकच्या माध्यमातून सुरेश यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सुरेश यांचा विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणावर मका पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आणि व्यवहार पक्का केला.
संशयितांनी मक्याचा माल पाठविण्याचे सांगून व्यापाऱ्याकडून २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांत ऑनलाइन पद्धतीने पैसे आपल्या बँक खात्यांमध्ये वर्ग करून घेतले. अशा प्रकारे एकूण २१ लाख ९४ हजार ४४० रुपये उकळण्यात आले. मात्र, संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतरही व्यापाऱ्याला कोणताही माल पाठविण्यात आला नाही.
सुरेश यांनी वारंवार संपर्क साधून मालाबाबत विचारणा केली असता, संशयितांकडून टाळाटाळ करण्यात आली. आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून संशयित शामलाल, विशाल शुक्ला, अविनाश पाटील, अजित जागीर सिंग सिद्धू आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) कलम ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आंतरराज्यीय ऑनलाइन फसवणूक प्रकरणाचा पुढील सखोल तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.














Discussion about this post