नवी दिल्ली : जंतरमंतर येथे आंदोलन केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या तीन नेत्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून, त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत. या कारवाईनंतर पक्षाचे नेते अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली.
जंतरमंतरवरील आंदोलन भोवले; तिघांवर गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार, जंतरमंतर येथे आंदोलन करताना प्रतिबंधित ठिकाणी बेकायदेशीर प्रवेश करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पुढे त्यांना दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. या कारवाईनंतर पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अभिजीत दिपके यांनी या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर आंदोलन दडपण्याचा आरोप केला.
‘तिरंगा फडकवणे या देशात कधीपासून पाप झाले?’
अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत म्हटले की, ‘पुढे येऊन करा ना, जे करायचे आहे ते! जंतरमंतरवर तिरंगा फडकवण्यासाठी तुम्ही पाच दिवस तुरुंगात टाकत आहात. तिरंगा फडकवणे या देशात कधीपासून पाप झाले?’ सरकारने कितीही कारवाई केली तरी आपण घाबरणार नसल्याचे सांगत दिपके यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ‘इतके घाबरू नका. जे करायचे आहे ते अधिकृतपणे करा. आणीबाणी लावायची असेल तर लावा,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला आव्हान दिले. सत्ताधारी नेते पोलिसांच्या मागे लपत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना ताब्यात घेतल्याचे दिपके यांनी सांगितले. तसेच, ताब्यात घेतल्यानंतर संबंधित नेत्यांना त्यांच्या वकिलांशी भेटू दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सौरव आणि आशुतोष यांना पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या अटकेमागील कारणांवर प्रश्न उपस्थित केले.’त्यांचा गुन्हा काय होता? ते जंतरमंतरवर गेले आणि त्यांनी तिरंगा फडकवला. नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत जंतरमंतरवर तिरंगा फडकवणे पाप झाले आहे का?’ असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली. ज्ञानेश कुमार हे सत्तेत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.कॉकरोच जनता पार्टी हा स्वतंत्र पक्ष असून, पक्षाच्या वतीने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. नागपूर पोलिसांनी दिलेली सुरक्षा आपण नाकारल्याचेही त्यांनी सांगितले.















Discussion about this post