सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) ने प्रशासकीय अधिकारी (AO) स्केल-१ पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली असून या भरतीअंतर्गत एकूण ३२१ पदे भरली जाणार असून, जनरलिस्ट आणि स्पेशालिस्ट अशा दोन्ही प्रवर्गांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ८ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भत्त्यांसह दरमहा अंदाजे १ लाख १४ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.

३२१ पदांचे प्रवर्गनिहाय विभाजन

NICL AO भरतीमध्ये २०० पदे जनरलिस्ट अधिकाऱ्यांसाठी, तर १२१ पदे स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांसाठी राखीव आहेत. स्पेशालिस्ट पदांचे विभाजन पुढीलप्रमाणे आहे.
वित्त (Finance) – २० पदे
कायदेशीर (Legal) – २० पदे
माहिती तंत्रज्ञान (IT) – २१ पदे
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी – १० पदे
रिस्क इंजिनिअरिंग – २८ पदे
कंपनी सेक्रेटरी – २ पदे
कृषी (Agriculture) – २० पदे
शैक्षणिक पात्रता काय?
जनरलिस्ट अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना किमान ६० टक्के, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत.
स्पेशालिस्ट अधिकारी: वित्त पदासाठी CA/CMA सह संबंधित पदवी किंवा पदव्युत्तर पात्रता, कायदेशीर पदासाठी कायद्याची पदवी, तर आयटी पदासाठी संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञानातील BE/BTech, ME/MTech अथवा MCA आवश्यक आहे.
ऑटोमोबाईल आणि रिस्क इंजिनिअरिंग पदांसाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पात्रता आवश्यक आहे. कंपनी सेक्रेटरी पदासाठी ICSI ची ACS/FCS पात्रता आणि संबंधित पदवीची अट आहे. कृषी पदांसाठी कृषी, कृषी जैवतंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकीतील चार वर्षांची पदवी अथवा संबंधित पदव्युत्तर पात्रता आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठीची अचूक पात्रता अधिकृत अधिसूचनेत तपासणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे
या भरतीसाठी १ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. दिलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवाराचा जन्म २ ऑक्टोबर १९९६ पूर्वी आणि १ ऑक्टोबर २००५ नंतर झालेला नसावा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
सुरुवातीचे मूळ वेतन ८२,४८५ रुपये
प्रशासकीय अधिकारी स्केल-१ पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीचे मूळ वेतन ८२,४८५ रुपये मिळेल. विविध लागू भत्त्यांसह एकूण मासिक वेतन अंदाजे १ लाख १४ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.
असा करा ऑनलाइन अर्ज
१. NICL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरती विभाग उघडा.
२. Administrative Officer Recruitment 2026 या संबंधित लिंकवर क्लिक करा.
३. नवीन नोंदणी करून आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
४. आवश्यकतेनुसार फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करा.
५. अर्जातील माहिती तपासून लागू असलेले शुल्क भरा.
६. अर्ज सबमिट करून त्याची पावती डाउनलोड करा.
अर्जाची अंतिम तारीख : २८ ऑक्टोबर २०२६
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतील पदनिहाय पात्रता, अर्ज शुल्क, आरक्षण आणि परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी.















Discussion about this post