जळगाव । जळगाव शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवरून महापालिका आवारात गोंधळाची घटना घडली. शहर पोलीस ठाण्याबाहेरील रसवंतीच्या गाडीवर महापालिकेने कारवाई करून ती जप्त केल्याचा राग आल्याने एका तरुणाने महापालिकेत येत महापौर दीपमाला काळे यांच्या वाहनावर हल्ला केला. या घटनेत वाहनाचे नुकसान झाले. वाहनचालकाने संबंधित तरुणाला दूर केल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकारानंतर महापौरांनी आयुक्तांशी चर्चा करून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले, तसेच महापालिकेत सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे आदेश दिले.

जळगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या रसवंतीच्या गाडीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. या कारवाईत रसवंतीची गाडी जप्त करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या एका तरुणाने थेट महापालिका आवारात येऊन गोंधळ घातला.

यावेळी त्याने महापौर दीपमाला काळे यांच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनावर लाडकी दांडक्याने हल्ला केला. यात वाहनाचे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महापालिका परिसरात खळबळ उडाली. वाहनचालकाने वेळीच हस्तक्षेप करून तरुणाला दूर केल्याने परिस्थिती अधिक चिघळण्यापासून रोखली गेली.
महापालिकेच्या आवारातच महापौरांच्या वाहनावर हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर महापौर दीपमाला काळे यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. संबंधित तरुणाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याशिवाय, महापालिकेच्या आवारात सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे आदेशही महापौरांनी दिले. अतिक्रमण कारवाईच्या रागातून घडलेल्या या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.















Discussion about this post