सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (IOCL) मार्केटिंग डिव्हिजनकडून ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती मोहिमेत देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण ३३५ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

कोणत्या पदांसाठी भरती?
या भरतीअंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस तसेच डेटा एंट्री ऑपरेटर अशा पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेतील किमान ५० टक्के गुणांसह तीन वर्षांचा नियमित डिप्लोमा आवश्यक आहे. तर ट्रेड अप्रेंटिस पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आणि संबंधित ट्रेडमधील दोन वर्षांचे पूर्णवेळ ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे.
ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून नियमित BA, B.Com, B.Sc किंवा BBA पदवी आवश्यक आहे. तर डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा किती?
या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असावे. वयाची गणना ३० सप्टेंबर २०२६ या तारखेनुसार केली जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसह आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळणार आहे.
परीक्षा आणि मुलाखत नाही
या अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. डिप्लोमा, पदवी किंवा ITIमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीत निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि पूर्व-नियुक्ती वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणी पूर्ण करावी लागेल.
१२ महिन्यांचे प्रशिक्षण
निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन ऑइलमध्ये १२ महिन्यांचे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत नियमानुसार मासिक विद्यावेतनही दिले जाईल.
अर्ज कुठे करायचा?
उमेदवारांनी IOCLच्या मुख्य वेबसाइटवरून थेट अर्ज करण्याऐवजी संबंधित राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ITI आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांनी NAPS पोर्टलवर, तर डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांनी NATS पोर्टलवर नोंदणी करावी.
नोंदणी पूर्ण केल्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून Indian Oil Corporation Limited (Marketing Division) हा पर्याय शोधून अर्ज सादर करता येईल. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.















Discussion about this post