मुंबई । पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणावर मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच सुनावले असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे.

“विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची हौस नाही. ते पुण्यात संघर्ष करून शिकत असतात. ते समाजकंटक नाहीत. परीक्षेत काही घोळ झाला असेल तर त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे,” अशा शब्दांत मुख्य न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांची बाजू स्पष्ट केली.

दरम्यान, न्यायालयाने विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंतीही केली आहे. परीक्षेतील कथित गैरप्रकाराच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांकडून पुण्यात आंदोलन सुरू असून, त्यावरून प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला वाद आता न्यायालयासमोर आला आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची दखल घेत त्यांच्याकडे समाजकंटक म्हणून पाहता येणार नसल्याचे स्पष्ट केले. परीक्षेच्या प्रक्रियेत काही घोळ झाला असल्यास त्याविरोधात विद्यार्थ्यांना आपला आवाज उठवण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
आता न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत पुढील सुनावणीत काय भूमिका घेतली जाते, याकडे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post