मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे आणि विरोधकांच्या आघाडीतील संभाव्य राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महत्त्वाचा दावा केला आहे. राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद आहे, मग दोघांमध्ये संवाद का असू नये? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांना राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत सहभागी करून घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. तसेच आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबत काही निर्णय होणार आहे का, अशीही विचारणा करण्यात आली.

यावर राऊत यांनी सांगितले की, आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीचा अजेंडा निश्चित असून त्यामध्ये मुख्य मुद्दा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा आहे. राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा मुद्दा भविष्यात स्वतंत्रपणे चर्चेला येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद असल्याचे राऊत यांनी सांगितले. सर्व विरोधी पक्ष एकमेकांशी संवाद साधतात, असेही त्यांनी नमूद केले. सध्या सुरू असलेले आंदोलन हे राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा भाग असल्याचे सांगत हा देखील एक प्रकारचा संवाद असल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही संदर्भ देत राऊत यांनी कालपर्यंत त्या आंदोलनात नव्हत्या, मात्र आता बैठकीला येत असल्याचे सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये संवादाची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
शरद पवारांबाबतही राऊतांचं भाष्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे म्हटले आहे. याबाबतही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते असल्याचे सांगत, त्यांच्या पक्षाबाबतच्या इतर राजकीय चर्चांना राऊत यांनी कल्पित असल्याचे म्हटले. केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आघाडीसोबत, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत राहील, असा दावा राऊत यांनी केला. सहकार, बँकिंग किंवा कौटुंबिक कारणांमुळे काही चर्चा होत असतात; मात्र त्यात राजकारण आणले जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनील तटकरे यांच्यावर राऊतांची टीका
यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. तटकरे यांचा पक्ष हा अजित पवारांचा पक्ष नसून अमित शाह यांचा पक्ष असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
अमित शाह भविष्यात दिल्लीत राहणार नसतील तर तटकरे यांच्या पक्षाचे भवितव्य काय असेल, असा सवाल करत राऊत यांनी तटकरे यांच्यावर टोला लगावला. याबाबत तटकरे यांनी संघ कार्यालयाच्या आसपास चिंतन बैठक घेतली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.















Discussion about this post